नेहमी प्रमाणे झोपण्यापूर्वी चिंटू वाचण्याची सवयचं लागून गेली आहे मला, आज पण चिंटूला पाहिलं, प्रभाकर वाडेकर सरांच्या निधनानंतर चिंटू काही काळ येणार नाही. मनाला पुन्हा एक चटका बसला तो भूतकाळाच्या आठवणींचा. मनाच्या पटलावर धूळ झटकून मी त्यांना थोड मोकळ करायचा विचार करून हे लिखाण सुरु केल.
लहान असताना मला वाटायचं कधी कोणी वृद्ध होऊचं नये. जगात कोणीच देवाघरी जायला नको, देव का बरे घेऊन जातो? हा प्रश्न मी आईला हजारदा विचारला असेल, कदाचित त्यापेक्षाही जास्तचं. आईपण मग काही सारवासारव करून मस्त पटवून द्यायची कि देवाला जो आवडतो तोच त्याच्या घरी जातो, त्याच घर खूप मोठ्ठं असतं, तिथे सर्व काही मिळत, आणि यावर जेव्हा मी म्हणायचे,"मग मी जाते ना देवबाप्पाच्या घरी, कस जायचं सांग ना?" तेव्हा आईच काळीज पिळवटून निघायचं कारण तिच्या डोळ्यात पाणी साठलेलं अजूनही मला आठवत, मग ती मिठ्ठीत घेऊन म्हणायची,"मी नाही का आवडतं तुला? मला सोडून जाणार असं पुन्हा बोलायचं नाही हं बाळा!" आताही डोळ्यात पाणी दाटून आलं. प्रत्येक मुलं असचं निष्पाप असतं.
कधी कधी वाटायचं पंख असते तर चालायला लागलं नसतं, शाळेतून सुटल्यावर पक्षांसोबत उडतं उडतं घर गाठल असतं. पण, असं कधी घडलच नाही, रस्त्यातून जाताना गरीब लहान मुलांना पाहून खूप वाईट वाटायचं, कधी कधी वाटायचं त्यांना घरी घेऊन जावूया आणि एकदा तसा प्रयत्न करताना ओरडा देखील बसला. का भिक मागताय विचारलं कि ते हसतच जायचे, तेव्हा मला त्याचं कारण कधी उमगलच नाही.
अजूनही आठवत एक खूप सुंदर आजी, मंदिरात बसलेली असायची, मी तिच्या अवती भोवती फिरत राहायचे, कधी कधी माझा खाऊ त्यांना पण द्यायचे, कालांतराने त्या खूपच दयनीय झाल्या, आणि काळाच्या ओघात गुडूप झाल्या. त्या आजी खूप घरंदाज घराण्यातल्या होत्या, त्यांचा मुलगा सोनार होता, तरी सुद्धा त्याने आपल्या आईची ही स्तिथी करून ठेवली होती. शेवटी म्हणतात ना, जे पेराल तेच उगवते, आणि तसचं झालं, तो सोनार एका अपघातात मारून गेला, त्याचं दुकान सुद्धा बंद पडलं.
मनाच्या या कपाटात अश्या कितीतरी गोष्टी बंद आहेत, काही आता सांगितल्या कारण होता तो चिंटू… काही दिवसांनी तो पुन्हा येईल आणि सगळ्यांना हसवू लागेल. आयुष्य पण काही असंच असतं, नेहमी पुढे चालत राहायचं. म्हणतात ना The show must go on...
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment