जोपर्यंत पुरुषांची मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत स्त्री-पुरुष समानता हे फक्त उडणाऱ्या पक्ष्यांचे थवेच आहेत. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या रोगट परंपरा अन बुरसटलेली मानसिकता स्त्रियांना मुक्तपणे श्वास घेऊच देत नाही. लग्न झालं कि नवऱ्याच घर तुझं, तू माहेरी काही येऊ नकोस, त्या घरातून बाहेर पडलीस तर चार खांद्यांवर पड! हे सल्ले आजही काही घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऐकवले जातात. लग्न होऊन पदरात पडलेल सासर जर चांगल असेल तर ते भाग्यच अन नाही तर मग, त्या स्त्रीवर किती मोठ संकट ओढवत ते तिलाच माहित! हक्काच्या घरात तिला ओझ समजून गोड बोलून हकालपट्टी केली जाते अन नवऱ्याच्या घरी रोजचं दाखवलं जात कि हे माझं घर आहे, तुला नाही जमत तर मग चालती हो इथून! जायचं कुठे स्त्रीने? जीव द्यायला? तेच जर स्त्री नोकरी करत असेल तर ती समर्थ असेलं स्वतःला सावरण्यास. पण, ज्या नोकरी करत नाहीत अन दिवसभर घरात राबराब राबतात त्याचं काय?
प्रत्येक स्त्रिने कोमलता सोडून आता कणखरच बनलं पाहिजे! स्वतःच्या माहेराशी संबंध वाईट होतील म्हणून स्वतःचा हक्क मागण्यास कुचराई करू नये. ज्याप्रकारे नवऱ्याच्या प्रत्येक सुख दुःखाची ती साथी होते तसेच तिने कायदेशीररित्या महिन्याला ठराविक रक्कम घ्यावीच अन कायदेशीरपणे घरात सुद्धा समान अधिकार घ्यावा. या जगात अगदीच भोळ राहून काहीच पदरात पडत नसते. प्रत्येक पुरुषाने जर ठरवलं कि त्याची मुलगी अन मुलगा, दोघेही समान आहेत, तर कोणत्याही मुलीवर अन्याय होणार नाही, या लिंगभेदापायी अगणित स्त्रिया राखेत खाक झाल्या आहेत, अगणित कळ्या निर्दयीपणे तुडवल्या गेल्या आहेत, …. समाजाच्या खोट्या दिखावूपणाला न भाळता काही पुरुष आपल्या मुलींना दुर्गा बनवत आहेत, सक्षम करत आहेत हे कौतुकास्पद आहे, हेच प्रत्येक पुरुष करायला लागला तर या जमिनीवर साक्षात स्वर्गच उतरेल हे नक्की!
माझ्या सर्व पुरुष वाचकांना विनंती करते, आपल्या आई, बहिणी, बायको, मुलगी, मैत्रिणी, अनोळखी स्त्रियांना समानता देताना एक विचार नेहमी लक्षात आणा, एक स्त्री जेव्हा तुम्हाला जन्म देते, तेव्हा ज्या वेदनेतून ती जाते, ती वेदना एकदातरी आठवा! मग आपसूकच मनातले बुरसटलेले विचार त्या वेदनेसोबत गळून पडतील!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment