Sunday, 21 April 2013

सेकण्ड इंनिंग भाग-४


विक्रम सुन्न मनाने खिडकीजवळ बसून होता, मुग्धा आणि रमेश किचेनची साफ सफाई मध्ये व्यस्त होते. विक्रम खिडकीच्या बाहेर एकटक पाहत होता, मुग्धाने एक चकार शब्द सुद्धा तोंडातून काढला नव्हता, ती फक्त तिच काम चोखपणे पार पाडत होती. ती मौन आहे म्हणूनच त्याच्या मनात आणि डोक्यात विचारांचं काहूर थैमान घालत होत. हलक्या पाऊलानी तो हळूच बेडरूम मध्ये गेला, कपाट उघडून मटकन खाली बसला, भराभर खालच्या कप्प्यातून सामान बाहेर काढू लागला, एक मळकट थैली सापडताच त्याच्या चेहऱ्यावर आपसूकच एक उत्सुकता दिसू लागली. थैलीची गाठ सोडवत जणू, तो वर्तमानातून भूतकाळात चालला होता… 

आठवनींचा पिसारा छातीशी लावत, अल्बमच एक एक पान तो पलटत होता, आईच्या कुशीत विसावलेला छोटासा विकी, बाबांच्या खांद्यावर बसलेला गब्बू विकी, पहिल्यांदा दात आलेला आनंदात काढलेला बाबांसोबतचा एक-दातवाला विकी, पहिलं पाऊल टाकून धम्म करून पडलेला रडका विकी, आईच्या पदराला धरून चालणारा गोंडस विकी, पहिल्या वाढदिवसाचा आई-बाबा सोबतचा फोटो… पुढे, मुरुचे केस ओढतानाचा फोटो, तो पाहून त्याच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू फुलल, मनातच बोलला, "किती मारायचो मी हिला, तरीपण सारखी यायची शेपटी सारखी पुन्हा मार खायला", मुरुने रंगपंचमीला काढलेले रंगीत अप्रतिम चित्र, अर्थात विकीच्या चेहऱ्यावर, तेही तो झोपेत असताना, मुरूच्या पहिल्या डान्सचे फोटो,"किती रडली होती, नाही नाचणार म्हणून किती समजावलं होत मी तिला." प्रत्येक फोटो मध्ये दडलेल्या भावना आपसूकच डोळ्यातून वाहू लागल्या, मग आईचे शब्द कानावर पडू लागले "विकी, असं बोलतात का बाबांना? सगळ समोर असूनपण तू असा कसा वागू शकतोस?" बाबांचा हतबल चेहरा, मुरूचा केलेला अपमान, मुरूच शेवटचे ऐकलेलं शब्द,"विकी, तू बोलतोयस हे" इतकचं, बोलून आईला बिलगून रडणारी मुरु आणि पुन्हा तिच्या तोंडून कधीच माझ्यासाठी काही नाही आलं, तरी सुद्धा मला सावरायला ती आली, मी इतका वाईट वागून सुद्धा मुरु आली… विक्रमला हुंदका अनावर झाला, रडतं रडतंच तो बोलत होता,"मला माफ करा, आई-बाबा, मुरु माफ करा… 

विक्रमच्या अचानक आलेल्या आवाजाने मुग्धा धावतच बेडरुममध्ये गेली, तसा तिच्यापाठी रमेशसुद्धा धावला. मुग्धा त्याच्याजवळ जाणार तोच रमेशने तिच्या खांद्यावर हात ठेऊन तिला थांबवलं, "त्याला मोकळा होऊ दे." दोघेही तठ्स्थपणे उभे होते. मुग्धाच्या डोळ्यातून आपसूकच पाणी निघत होत. विक्रम जणू मनाशीच बोलत होता, मनाशीच त्याचं जणू काही बोलन सुरु होत, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुना चाखत तो स्वतःशीच पुटपुटला, "अजूनही आठ्वणींचा झरा, वाहतोच आहे, पण त्यात आता, मिठाची चव नाही राहिली, त्यात आहे फक्त निर्मळ अथांग निरपेक्ष प्रेम, फक्त तुझ्यासाठी...."

प्रिया सातपुते 






















No comments:

Post a Comment