Celebration of Puberty!
उत्सव ऋतुचक्राचा!
कळीच फूल बनणं हा प्रवास खरतरं खूपच सुंदर आहे! एखादा गुलाब जेव्हा उमलतो तेव्हा सारेचं भान हरपून जातात, हे जरी खरं असलं तरीही कळीतून फूल हा प्रवास त्याहूनही सुंदर आहे. पण, जेव्हा एखादी मुलगी या प्रवासाची पायरी चढते तेव्हा आसपासच्या लोकांच्या भुवया वरती जातात. अग! एवढ्या लवकर कशी मोठी झाली? अग बाई! कावळा शिवला का पोरीला? काय ग बाई सगळं बाईच्याच जातीला! मग हळुहळू त्या लहानगीच बालपण अश्या टोमण्यांनी आपणच हिरावून घेतो आणि नको त्या वयात तिला प्रौढ करतो.
वयात येणं! ही एक नैसर्गिक बाब आहे. तिला धर्माच्या चौकटीत बांधून स्त्रियांना स्वतःच्याच शरीराबद्दल अनादर, अनास्था करण्यास वर्षानुवर्षे भाग पाडले जाते. तिच्या मनात भयानक गोष्टी बिंबवल्या जातात. लहानग्या जीवाला तिच्या शरीराची सगळ्यात नॉर्मल बाबीचा बाऊ करायला शिकवलं जातं. या दिवसांत एका कोपऱ्यात बसायचं, कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, देवासमोर अथवा देवाला स्पर्श नाही करायचा, मंदिर प्रवेश बंद, घरात काही शुभ कार्य असेल तर फिरकायच नाही! जशी काही ती अपवित्रच झाली आहे, त्यावर कहर म्हणजे जर देवाला शिवलंस तर नापास होशील, ढ होशील, मुलांशी बोलशील तर प्रेगनंट होशील...अशे वाटेल त्या वाईट गोष्टी तिच्या मनात भरवल्या जातात, जेणेकरून तिच्या मनात भीतीच हे पिल्लू, भूताच रूप घेऊन ते आयुष्यभर तिच्या मानगुटीवर बसलं जाईल.
आपणांस निसर्ग अर्थात देवाने घडवलं असं जरी मान्य केलं तरी निसर्गतः प्रत्येक महिन्याला येणाऱ्या ऋतुचक्रास घृणास्पद, हीन का समजावं? ज्या गोष्टीमुळे संपूर्ण जग अस्तित्वात आहे; ती बाब पाप असूच कशी शकते?
ज्या परमेश्वराने स्त्रिला गर्भाशय दिला, त्या गर्भात नऊ महिने राहून जन्माला येणार मुलं पाप नसतं पण, एक स्त्री मात्र या नैसर्गिक ऋतुचक्रात पापी, कावळा शिवलेली, अडचण असलेली एका अडगळीच्या खोलीत बसवली जाते, का?? तर, घरात तिची सावली पडेल, अन्न नासेल, तुळस जळून जाईल, देव कोपेल अन बरंच काही...
एका हाडामासाच्या मुलीला मन असू शकत हे सारे विसरून गेलेत, हीन बुरसटलेल्या परंपरांनी शिक्षित समाजालाही अडाणी करून टाकलं आहे म्हणूनच अगदी काही डॉक्टर बनलेल्या मुलीही या परंपरा पाळतात तर कमी शिकलेल्या स्त्रिया आपल्या मुलींना यातून बाहेर काढताना मी पाहिलं आहे, किती हा विरोधाभास!
आपली लहानमुले सध्या इंटरनेटच्या महाजाळात वेगवेगळ्या विकृतींना बळी पडू शकतात, त्यांना त्यांच्या शरीरातले बदल नीटपणे सांगायला हवेत. योग्य वयात, योग्य माहिती त्यांना वाईट प्रकारांपासून दूर ठेवू शकते. वाईट प्रकार मग ते मानसिक नैराश्य असो, पॉर्न पाहणं असो वा नको त्या वयात लैंगिक संबंध, या अश्या प्रकारांपासून त्यांना योग्य माहितीच परावृत्त करू शकते. यासाठी त्यांना आपली साथ अन मैत्रीचा हातच हवा असतो.
या लहानग्यांना कळीतून फुलात रुपांतरीत होऊ द्या! त्यांना त्यांचं बालपण मजेत घालवू द्या! तारुण्याच्या उंबरठ्यावर नवं आयुष्य त्यांना साद देत आहे, महिन्याचे ते दिवस अशी ओळख करून देण्यापेक्षा त्यांना कळू द्या हे तर सेलिब्रेशन आहे...Don't make it embarrassment for them, make it celebration of Puberty to welcome new phase of life.
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment