Wednesday, 24 October 2012

!! दसरा !!



आज आपण दसरा साजरा करत आहोत, आजच्या या दिवशी आपण रावणाला जाळतो, अन्यायाचा नायनाट व्हावा म्हणून देवीला साकड घालतो...सगळी कडे भारत देशात हे नऊ दिवस प्रचंड जल्लोष असतो, दांडिया, गरबा, देवी पूजा, काली माता पूजा, दुर्गा पूजा, अश्या बऱ्याच गोष्टी आपण करत असतो. ज्या स्त्रीरूपी देवीची आपण पूजा करतो, जिला आपण साकड घालतो, सुखी ठेव, पैसा दे, मुलगा दे, आणि मुलगी नको???

एका स्त्रीशक्ती कडेच आपण मुलगी नको म्हणतो....का??? ही मानसिकता आहे कि दुसर काही याचं विश्लेषण मला इथे करायचं नाही, आजपर्यंत बऱ्याच लोकांनी पुढाकार घेऊन स्त्रियांचं आयुष्य बदलवण्यात हातभार लावले आहेत. पण, एक स्त्री म्हणून मी किंवा स्वतः तुम्ही किती हातभार लावलेत? किंवा एक पुरुष म्हणून तुम्ही एका स्त्रीला किती रूपांमध्ये पूजनीय ठरवता आणि मानता? एक मुलगा म्हणून? एक पती म्हणून? आणि एक पिता म्हणून? कि एक खूनी म्हणून???

भारतीय संस्कृती पितृसत्ताक आहे, म्हणून, आजच्या काळात स्त्री अर्भक त्यांच्या नजरेतून काय आहे? हे तितकंच महत्वाच आहे. जरी स्त्री २२ व्या शतकाकडे धावत असली तरीही अजूनही तिला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. मग त्यात ती स्वतःच्याच बाळाची खूनी देखील होऊ शकते...ज्या विरोध करतात त्या एकतर कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बळी ठरतात तर काही विद्रोही. 

अजन्म्या कळीला आपण उमलूच देत नाही, का? रोज सकाळी जेव्हा मी वर्तमानपत्र हातात घेते, तेव्हा मनात एक भीती असते, आज कोणत्या आईने आपल्या नवजात मुलीला मारून टाकल? आज कुठे नवजात अर्भकाचा मृतदेह सापडेल? अश्या, एक नाही हजारो वेगवेगळे प्रकार आहेत...आजही जेव्हा बाई प्रसूत होते, तेव्हा आसपासला ज्या कोणी स्त्रिया असतात त्याच पहिला प्रश्न करतात, "काय आहे?" मुलगा म्हंटल रे म्हंटल कि सगळीकडे एकच जल्लोष सुरु होतो, आणि मुलगी म्हंटल कि सगळ्यांची तोंडे काळी का होतात?

ज्या देवीला आपण मनोभावे पूजत आहोत तिही एक स्त्रीच आहे, स्त्रीच स्त्रीत्वाचा अपमान करतेय....मग अश्या या स्त्रियांना देवी शिक्षा का देत नाही? हा प्रश्न मला लहानपणापासून पडत आला आहे, पण आता मला त्याच उत्तर सुद्धा गवसलं आहे.
ज्या घरात स्त्रीत्वाचा अपमान होतो तिथे लक्ष्मी नांदेल तरी कशी, तिची अवकृपा होणारच.
म्हणूनच म्हंटल जात, "जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर , जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर".

आज दसरा आहे...."देवीला एकच साकड घालेन या कळ्यांना बागडू दे, जगू दे, आणि सर्वाना चांगली बुद्धी दे."

प्रिया सातपुते

2 comments:

Post a Comment