Sunday 7 July 2013

खरचं, तुला आई व्हायचय का?



हल्ली आई होण्याच फॅड आलं आहे, म्हणजे कशी आई, सुटसुटीत आई, गरोदरपणाचे नऊ महिन्याचे त्रास न घेता डायरेक्ट बाळ हातात. कल्पना सुंदर आहे, हे म्हणजे कसं झालं, अभ्यास ना करता पहिला येण, काहीही न करता करोडो रुपयांचा मालक होण. एकंदरीत झाडाला मुले लटकली आहेत आणि आपण जाऊन फक्त आपल्याला जे फळ अर्थात मुलं आवडेल ते तोडून घेऊन जायचं. 

वाचूनच किती सुंदर वाटत असेल ना? नाही? का नाही पण? 

आपल्या समाजानेच तर हा नियम सुरु केला आहे. एखाद्या जोडप्याला मुल होत नसेल तर त्याने दुसर लग्न कराव, मग तिथेही काम झाल नाही तर, पुन्हा तिसर,… आता सध्या हे प्रमाण कमी झालं असेल पण, अजूनही अश्या गोष्टी घडतच असतात. स्त्रीच्या मनावर बिंबवलं जात कि "एक स्त्री आई बनल्याशिवाय पूर्णत्व अनुभवत नाही", असं बोलून संपूर्ण स्त्री जातीचा अपमानच करत आहेत हे लोक. ज्या निसर्गाने आपल्याला घडवलं, ज्या आईने आपल्या जन्माला घातलं, आणि ज्या देहाच्या जोरावर आपण या जगात वावरतो तो अपूर्ण असेलचं कसा? प्रत्येकाच्या कर्माने, त्याच्या लेख्या जोख्याने, जे आहे ते मान्य करून आपण आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरांचा मान ठेवला पाहिजे. निसर्गाचा मान ठेवला पाहिजे. 

पण, दुर्दैवाने असं होताना दिसत नाही, मुलं न होण हे सर्वस्वी स्त्रिच्या माथी मरकटल जात. ज्या भारत देशात स्त्रिला पूजनीय समजल जात, तिथेच तिला वांझोटी म्हणून हिणवलं जात. मानसिक आणि शारीरिक त्रासातून तिची सुटका फक्त एकतर मृत्यू किंवा मुलंच करू शकते. 

सायन्स कितीही पुढे गेलं असेल तरी सुद्धा ते मनाचे घाव भरण्याच औषध शोधू शकत नाही. मुलं होण्यासाठी बरेच नवीन उपचार उपलब्ध झाले जरी असले तरी त्यातले दुष्परिणाम मात्र नजरेआडच जातात. यात मग, गर्भाशय भाड्याने देण, शुक्राणू विकत घेण, मानसिक ताण, कायद्याच्या बाबीही आल्याच. हे सार आपण कशासाठी करतो, एका तान्हुल्या बाळासाठी. मग, इतक्या साऱ्या अनाथ आश्रमात आई बाबांची वाट पाहणाऱ्या या चिमुकल्यांना का नाही जवळ केल जात? का ? तर ते आमच रक्त नाही, कुठल्या जाती धर्माचं आहे कोण जाणे? लोक काय म्हणतील? अशे एक नाही हजारो प्रश्न शिकलेल्या या मंदबुद्धी माणसांना पडतात आणि ते पुन्हा त्याच चक्रव्युहात अडकतात…"मला आई व्हायचंय?"

जराशे डोळे उघडून पहा तर आजूबाजूला असणारया "सिंधुताई सपकाळ" अर्थात "माई" तुम्हाला दिसतील, आणि तेव्हा अश्या या माणसांना फक्त एकच प्रश्न विचारण्याची सुप्त इच्छा होते, "खरचं, तुला आई व्हायचय का?"

प्रिया सातपुते 



















No comments:

Post a Comment