Monday, 25 November 2013

खंर प्रेम कसं ओळखाल ?

जो तुमच्यावर जीव ओवाळून टाकतोय, जो तुमच्यासाठी जगाशी लढेल, जो घरच्यांच्या विरोधात तुम्हांला साथ देईल…आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे, तुमच्या नाकातून वाहणारा तुमचा शेंबूड जो साफ करेल ती व्यक्ती खऱ्या अर्थाने तुमच्यावर खंर प्रेम करते. ईई… काय करताय? लहान असताना जेव्हा तुम्हाला साधं बोलता देखील येत नव्हत, तेव्हा तुमचं वाहणार नाक साफ करणारी आई अन तुमचे बाबा तर कधी तोंड वेडवाकड करत नव्हते…हेच ते निरपेक्ष खंर प्रेम!
Love you Mumma Papa! 

प्रिया सातपुते

उखाणा!

रात्र ओशाळली
झोपेच्या मोहात
अन मी जागीच राहीले
*टिंब टिंब* च्या मोहात…

प्रिया सातपुते


चारोळी

वारा सैरभैर झाला
प्रेमात आकंठ बुडाला
विरहात थैमान मांडून गेला
अन प्रेमभंगात कडकडून रडला…

प्रिया सातपुते 

कोण म्हणतंय...


कोण म्हणतंय
प्रेमात पडलेलेच
कविता करतात
मी तर म्हणते
नेहमी स्वतःच्या
प्रेमात असणारेच
कविता जगतात…

प्रिया सातपुते

Saturday, 23 November 2013

आत्तुवास…

भाचीला छळताना
आठवतो माझाच भूतकाळ
अन दुसऱ्या क्षणात
गळून पडतो माझा आत्तुवास…

प्रिया सातपुते

चारोळी


संपलेल्या अध्यायाच
पान पुन्हा चाळायच नसतं
अन पाठ फिरवलेल्या माणसाकडे
डोळे लाऊन बसायचं नसत…

प्रिया सातपुते

किल्ली!


मी कोण?
तू कोण?
सगळेच एक गूढ आहे
अन गूढाची किल्ली
माझ्याचं हाती आहे!

प्रिया सातपुते

Monday, 18 November 2013

आज बऱ्याच दिवसांनी मनाला फोन लावला…


आज बऱ्याच दिवसांनी मनाला फोन लावला…

मन- हेल्लो!
मी- हाई…
मन- ओह तू…हाय
मी- मग काय? माझ्याशिवाय दुसंर कोण फोन लावणार तुला?
मन- ह्म्म्म! तसं तुला वाटत…
मी- बर बाबा सॉरी!
मन- ह्म्म्म!
मी- बस ना आता, माझ्या मना कसा आहेस तू?
मन- मी एकदम झक्कास, तू बोलं तू बरी आहेस ना?
मी- हो, मी सुपर झक्कास आहे…
मन- पक्का ना??
मी- हो रे! तुला काय वाटलं फक्त रडायलाच तुझी आठवण काढते का मी?
मन- नाही ग, पण…
मी- पण, काय हा?
मन- आता भांडणार आहेस का माझ्याशी तू?
मी- नाही रे…
मन- मग, बोल काय सुरुय तुझ्या मनात?
मी- तू न अगदी मनकवडा आहेसं बघ!
मन- माहितेय मला…आता बोलशील का?
मी- हो रे, पण तू का इतकी घाई करतोयस!
मन- अग! मी मूवी पाहता पाहता आलोय तुझ्यासाठी
मी- मग ठेव ती बाजूला
मन- ठेवली।
मी- ऐक ना
मन- सांग ना
मी- मला ना असं वाटतंय कि आज मी मुक्त झालेय…
मन- मुक्त? कशातून प्रिया?
मी- स्वतःच्याच भावनांतून, स्वतःच्या चक्रातून, स्वतःच्या विचारातून
मन- असं का वाटतंय तुला ?
मी- वाटेत आलेला सागर पार करून पुढे निघून गेल्या सारखं वाटतंय, सगळ्याच्या पलिकडे…प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त झाल्यासारखं वाटतंय, जिथे कोणीच मला दुखवणार नाही, ना कोणीच मला स्पर्शू शकणार ना पाहू शकणार…
मन- वाह! हे तर छानच झालं ना, ना आईने ओरडल्यावर तू मुळूमुळू रडशील, ना बाबांनी फोन कट केला म्हणून डाफरशील, ना तू मैत्रिणींच्या अडचणीत त्यांना मदत करशील, ना तू तुझ्या फुलपाखराला पाहशील…
मी- खरंच किती शांती असेलं ना?
मन- वेडाबाई जागी हो, हा तर आयुष्यातला पहिला चिमुकला तलाव पार केलास तू, ज्याला तू सागर समजत आहेस, ते तर डबकच आहे असं म्हणेन मी…आता कुठे नव्या मार्गावर पहिलं पाऊल पडलंय तुझं…असं समज आज खऱ्या अर्थाने तुझा गृहप्रवेश झालाय नव्या आयुष्यात…
मी- ह्म्म्म
मन- अलिप्त का नाही वाटणार तो मनुष्याचा स्थायीभाव आहे, एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर मिक्स अप व्हायला थोडा वेळ लागतोच बेटा…भावना तर क्षणाक्षणाला बदलत असतात, स्वतचे चक्रव्यूह असं जे काही तू बोलते आहेसं तेच तर तुझे विचारच आहेत ना? आता मला फोन लाऊन सुद्धा तू विचारातूनच तर बोलतेयस ना? मी आणि तू अलिप्त होऊ शकतो का कधी? तुला माहितेय ना मनुष्य देहाचा तुझा अंतिम श्वास सुद्धा आपल्याला वेगळा करू शकत नाही!
मी- बाप रे! किती बोलतोयस तू? तू तर चक्क प्रवचनच दिलं आज मला…
मन- ह्म्म्म…
मी- मला वाटायचं फक्त मीच प्रवचन देऊ शकते, तू तर सॉलिड निघालास! 
मन- आवडलं ना पण? तिलांजली मिळाली ना तुझ्या विचारांना?
मी- हो ना…अर्थात त्यात तर तू एक्स्पर्ट आहेस!
मन- ते तर मी आहेचं…
(दोघेही खूप हसतो)
मी- अरे तुला मूवी पहायची आहे ना?
मन- अरे हो, विसरलोच मी!
मी- बर ठिक आहे, मी पळते झोपायला, तीन वाजत आलेत आता, पप्पा आले तर माझी खैर नाही, तुझं आपलं बर आहे इनविझीबल!
मन- (हसून) ओके! जा पळ…गुड नाईट!
मी- गुड नाईट! एन्जॉय द मूवी…
मन- ओके मेडेम!
मी- आणि हो…आज जरा वर्ड टूरच स्वप्न दाखवं!
मन- हो राणीसाहेब! जशी तुमची आज्ञा…
मी- (हसून) बाय…भेटू पुन्हा!
मन- बाय…लवकरच!

स्वत:च्याच मनाशी बोलून स्वर्ग ठेंगणा होतोय.

प्रिया सातपुते

Friday, 15 November 2013

प्रियांश…१३


प्रेमात कोरडा राहिलेला माणूस, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम शोधत राहतो…ते जर मिळालं तर समोरच्या व्यक्तीसारखी नशीबवान व्यक्ती कोणी असूच शकत नाही…प्रेमाच्या सागरात महापूर येतील आणि समोरचा माणूस एकतर गुदमरुण मरेल किंवा त्याच्या हाताला पकडून किनारा गाठेल… अशे हे प्रेमात कोरडे राहिलेले महाभाग कधी कधी चुकीच्या मार्गांना भरकटून खूप दूर चालले जातात तर काही प्रेमाच्या मृगजळात अडकून गतप्राण होतात किंवा अश्वथामा सारखे अंत येऊ पर्यंत भटकत राहतात…फरक तो इतकाच अश्वथामा भटकतोय मोक्षासाठी तर तो भटकतोय प्रेमात पडण्यासाठी… 

प्रिया सातपुते 

Thursday, 14 November 2013

प्रियांश... १२


कधी कधी आपण खूप चिडतो, ओरडतो, समोर जे कोणी उभे असेल त्याला यथेच्छ बडबड बडबडतो…अन पुढच्या क्षणाला त्याचं व्यक्तीच्या गळ्यात पडून रडरड रडतो सुद्धा…सगळीच माणसे अशी नसतात ती मनात गोष्टींचा किल्ला बांधतात आणि कालांतराने त्याचं किल्ल्याचा ढाली सारखा उपयोग करून समोरच्याला पायाशी लोळवण घ्यायला लावतात…कशासाठी हे सार? काय साध्य होणार त्यांना रात्रीची गाढ झोपेची जागा मनातली अस्थिरता घेणार…दुसऱ्याच्या वाईटावर टपलेल्या लोकांना बहुदा विसर पडत असावा नियतीच्या चक्रात प्रत्येक गोष्ट त्याला परत मिळणार असते…खड्याला खड्डा अन रक्ताला… 
Be wise, Choose wise!

प्रिया सातपुते 

Wednesday, 13 November 2013

बालदिनाच्या इंटूकल्या, पिंटूकल्या, मिंटूकल्या शुभेच्छ्या!!


रोज सकाळी लवकर उठायचं
थंडी वाजतेय म्हणून
बाबांच्या कुशीत शिरायचं
दोन मिनिट, दोन मिनिट करत
तासभर झोपायचं
आईच्या धप्पाट्याने
डोळे चोळत चोळत अंघोळीला जायचं
नाश्ता करताना
टेबलावर डुलक्या काढायच्या
हिवाळ्यातल्या सकाळच्या
शाळेला तोंड वाकड करून जायचं
प्रार्थनेला उशीर झाला कि
ग्राउंडभर पळायचं
धाप्पा टाकत
हजेरीला सामोर जायचं
गणिताच्या तासाला
डोळे तिष्टत बसायचं
सरांना चुकवून
डोळे उघडे ठेवून
डुलक्या काढायच
पाच तासानंतर
पोटभरून सुट्टीला खायचं
इंग्रजीच्या तासाला
मिटक्या मारत
इंग्लिश विंग्लिश बोलायचं
पिटीच्या तासाला
फुलपाखरासारखं बागडायचं
शेवटच्या तासाला आतुर व्हायचं
बेल कधी वाजेल
अन कधी घर गाठेन
अस व्हायचं
घर गाठताच
पोटभर खाऊ अन पोटभर अभ्यास करून
खेळायला जायचं
कधी सिंड्रेला पार्लरचे
दरवाजे ठोठवायचे
तर कधी वॉंचमनला
जाऊन हैराण करायचं
तकतुम्बाला घरी पाठवायचं
विष अमृताला प्राशन करायचं
लपंडावात इवल्या इवल्या
माझा डाव वाचावं
म्हणून जोरजोरात ओरडायचं
आयांच्या आवाज सुरु झाले
कि घर गाठायचं
चिऊचा घास भरवून घेत
आईच्या मिठ्ठीत स्वर्गानुभव घ्यायचा
अन झोपतांना बाबांच्या कुशीत
रोज एक नवी गोष्ट ऐकून
सुखाच्या दुनियेत रममाण होऊन
सोन्याच्या बेडवर झोपून जायचं
असं होत ते धम्माल बालपण….

प्रिया सातपुते

प्रियांश... ११


काल संध्याकाळी मी बाहेर चालले होते, गाडीचा दरवाजा उघडून आत बसणार तोच माझं लक्ष एका तान्हुल्या बाळाकडे गेले, आमच्या दुसऱ्या पार्किंग मध्ये पालथ पडून माझाकडे ते एकटक पाहत होत…अंधार पडला होता, त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हत…गुबगुबीत सहा सात महिन्याची ती मुलगी होती…आधीच जमाना ठिक नाही आणि ती चिमुकली एकटीच माझं मन मला जाऊ देईना…मी आजूबाजूला पाहिलं, कोणीच दिसतं नव्हत, वॉचमन पण दिसत नव्हते, लहान मुले दिसली, त्यात एका मुलीला बोलावून मी विचारलं,"हे बाळ कोणाचं आहे?" आमचं आहे असं उत्तरं ऐकून मला थोडं बर वाटलं, तिला ओरडून मी म्हंटले,"आपल्या छोट्या बहिणीला इथे टाकून काय करतेस तू? कोणी उचलून नेलं म्हणजे?" तोच तिच्या आईचा आवाज कुठून आला काय माहित,…ती त्या बाळाला घेऊन खेळायला गेली. थोड्या वेळाकरता मी त्या बाळाला मनातून पुसायचा प्रयत्न केला…पण मन थाऱ्यावर नव्हत…घरी आल्यावर आधी मी ते बाळ दिसतंय का पाहिलं, कुठेच दिसलं नाही…बायका आई बनायला तरसतात आणि इथे…मनात प्रश्नांचं काहूर घेऊन मी घरी आले…आई अन दादाशी बोलले मग कळाल कि या बाळाच सार कुटुंब आमच्या पार्किंग मधेच राहतात, त्यांना राहायला घर नाही…एकेकाळी चार पाच दुकानांचे मालक होते…मुलाने दारू अन जुगारात सगळ उधळलं…रहायला घर नाही, तीन मुली आहेत…मुलग्याच्या हव्यासापोटी दोन मुलीनानंतर सुद्धा समाधान झालं नाही अन पदरात पुन्हा हि चिमुकली…काय खायला घालणार? काय शिक्षण देणार हे त्यांना? अजूनही ती मोठी मुलगी खालीच पार्किंग मध्ये खेळताना दिसते…तिला तरी काय समजतय…माझ्या भाचीला एकटी साध खाली पाठवत नाही मी…ती खेळायला जरी गेली तरी सुद्धा लक्ष असतं…काय अधिकार आहे अश्या माणसांना मुलांना जन्माला घालायचा? ना त्यांना त्यांची काळजी आहे ना त्यांना फिकीर आहे कि त्यांची मुले अशीच पडली आहेत…भटकी कुत्रे कमी नाहीत, मोठ्या माणसांवर तुटून पडणारे…एक मिनिट सुद्धा पुरून जाईल त्यांना त्या तान्हुलीचे लचके तोडायला, ना ती प्रतिकार करेल, ना ती पळेल…पालकत्व  स्विकारण किती मोठी जबाबदारी आहे…बोट पकडून त्या चिमुकल्या पावलांना पाहिलं पाऊल टाकायला शिकवण्यात किती मोठा आनंद सामावला आहे तितकीच जबाबदारी…ज्यांना ती जमत नाही त्यांनी कशाला जन्माला घालून आयुष्य खराब करायचं या परयांच? 

प्रिया सातपुते 

Sunday, 10 November 2013

प्रियांश... १०


मला एकं समजत नाही, लग्न काय फक्त भारतातच होतात का? सगळ्या जगभर होतातच ना? कुंडली जुळवूनच लग्न करणार म्हणून काही महाभाग प्रेमात समोरच्या व्यक्तीला चुना लावतात…कुंडल्या पाहून सुद्धा लोकांचे घटस्फोट होतातच ना!…बाहेरच्या देशात घटस्फोट जास्तीत होतात म्हणून तिथे टिकलेली लग्न सुद्धा आहेतच कि…कुंडल्या जुळवून लग्न करून नंतर कोर्टाच्या पायऱ्या चढणारे सुद्धा कमी नाहीत…मने न जुळवता लग्न टिकतील कशी? कुंडलीच्या स्तोमामुळे प्रत्येक मंदिराच्या झाडाजवळ आता ज्योतिषांची गर्दी वाढली आहे, पोपटांचे हाल बघवत नाहीत, बिचाऱ्याला काट्या मारून मारून पिंजऱ्यातून बाहेर काढलं जात…ज्योतिष हे एक प्राचीन शास्त्र आहे…कुंडल्या जुळत नाहीत म्हणून आपल्या योग्य जोडीदाराला हातचा घालवून बसू नका…प्रार्थनेत खूप ताकत असते, जस्ट प्रे! त्या अज्ञात शक्तीवर विश्वास ठेवा आणि योग्य निर्णय घ्या! एक पोपट आणि कुंडली तुमचं आयुष्य बनवू शकत नाहीत…

प्रिया सातपुते 

प्रियांश...९


आज पुन्हा जात नावाच्या जखमेची खपली निघाली अन रक्ताची चिळकांडी उडाली. जोपर्यंत या देशात माणसाला माणूस म्हणून वागवलं नाही जाणार ही जखम कधीच भरणार नाही…भूतकाळात रमणारी मी नाहीच पण, नजरेखालून जातीच्या नावाने होणारे किळसवाणे प्रकार जेव्हा नजरेसमोर येतात तेव्हा मन भरकटत भळभळून वाहणाऱ्या त्या बालिश मनाजवळ येऊन पोहचत, अपमानाच्या रक्तात चिंब ओथंबलेलं माझं सात वर्षांचं मन…जिथे ना जात माहित होती ना धर्म! 
आई बाबांना मदतीला दुकानांत जायची, मग अभ्यास कसा होणार? एकटीला घरात कसं सोडणार म्हणून शाळेजवळच एका बाईंकडे मला पाठवण्यात आलं…देवाने फार लवकरच गोष्टी समजायचा आशीर्वाद दिला होता कि शाप हे अजूनही माहित नाही. मला त्यांच्या बाहेरच्या खोलीत शिकवलं जायचं, एकदा माझा अभ्यास संपवून मी गपचूप बसले होते, आतून बाईंचा आवाज आला, आत ये आणि दाखव अभ्यास…दुसऱ्याच्या घरात आतपर्यंत घुसण्याची माझी सवय नव्हती, पुन्हा एकदा आवाज आल्यामुळे मी आत गेले, दचकत मी पुढे जात होते तोच त्यांच्यातला चातुर्वर्ण्य जागा झाला असावा…नको नको थांब तिथेचं आत येऊ नकोसं म्हणत त्यांनी मला दरडावल! अभ्यास दाखवून मी माघारी परतले तोच आवाज कानी पडले, बाई आणि त्यांची मुलगी बोलत होत्या, " आत आली असती ती आता, पुन्हा नको बोलवूस, सार माजघर पवित्र करावं लागलं असतं." त्या रात्री मी माझ्या आई बाबांना प्रश्नांनी भंडावून सोडलं होत, पवित्र म्हणजे काय? गोमूत्र का मारतात? तसं का बोलल्या त्या? त्यांनी मात्र कलाने घेत मस्त पैकी सगळ्या प्रश्नांना गुंडाळून ठेवलं. 
खूप छान होत्या त्या बाई, काहीच तक्रार नाही त्यांच्याबद्दल! फक्त एकचं विचारूस वाटत त्यांना, त्या तर शिक्षिका होत्या ना, तरी सुद्धा त्यांनी अश्या गोष्टींना प्रोहोसान का दिलं? माझ्यातल्या सात वर्षाच्या मुलीला न पाहता त्या इतक्या कर्मठ का झाल्या? 
शिक्षकच अशे वागतील तर समाज कसा घडेल? 

प्रिया सातपुते 

Saturday, 9 November 2013

प्रियांश...८


इतिहासातील काळा दिवस म्हणून याचं दिवसाची नोंद असेल…कोणताही समाज मग तो जगाच्या पाठीवरचा कोणताही देशातला असू दे… स्त्रिचा अवमान करून श्रेष्ठ ठरूच शकत नाही…याचं दिवशी कुरुक्षेत्राचा दिशेने पहिलं भक्कम पाऊल पडले…जुगारात स्वतः  ला हरलेल्या युद्धीष्ठीराने पांचालीला पणाला लावले…पाच योद्धे नवरे असूनही ते लाचार दासांप्रमाणे मान खाली घालून गपचूप बसले होते…आपल्या मोठ्या भावाच्या चुकीच्या गोष्टीना तिथेच न थांबवता, भातृप्रेमात अंध झालेल्या अर्जुनाला शांत बसवलंच कसं?…शंभर हत्तीचं बळ दंडात असूनही नपुंसकासारखा तो भीम गारद कसा झाला? सत्य आणि धर्माचा पक्का युद्धीष्ठीराचा न्याय बुद्धी तर्क आपल्याच बायकोच्या वस्त्र्हरणात विलीन का झाला?…रणांगणात शत्रूंना चितमुंडी गारद करणाऱ्या त्या नकुल-सहदेव ला इतका घोर अवमान सहनच कसा झाला?…बहिणीची छेड काढली म्हणून मारामारी करणारे ते भाऊ या अश्या षंढांपेक्षा लाख गुणा चांगलेच…आपल्या आया-बहिणीसाठी पेटून उठणारेच खरे योद्धे…कृष्णदेव धावून आले म्हणून ती पांचाली वाचली…नाही तर काय झाले असते?…वाचून तिच्या नजरेला नजर देण त्या पाचही पांडवांना किती अवघड झालं असेलं…तिच्या नजरेत पुन्हा उभे राहण्यासाठी मांडण्यात आलेला तो डाव म्हणजेच महाभारत नाही का??? 
एका स्त्रिला दोषी ठरवून आपण खुशाल टाळ्या बडवत असतो…स्त्रिच प्रत्येक गोष्टीला कारणीभूत असते म्हणून निष्कर्ष काढून तिच्या माथ्यावर सगळ मारून बोललं जात…एक स्त्रिच विनाशाला कारणीभूत असते…पण, मग अश्या  षंढांच काय? टाळी एका हाताने कधीच वाजत नाही,…प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात…माझ्या नजरेत महाभारत घडण्यास कारणीभूत फक्त पांचाली आणि दुर्योधन नाहीत तर स्वतः पांडवच आहेत!…आताच्या जगात सुद्धा दुर्योधन कितीही असोत पण, पांडव गप्पच आहेत…जो पर्यंत ते गप्प राहतील तोपर्यंत अशी वस्त्रहरणे होतच राहणार…आता तुम्हीच ठरवा तुम्ही पांडव व्हाल कि कृष्ण!

प्रिया सातपुते 

Friday, 8 November 2013

I'm in love...;)


हल्ली सगळ कसं 
गुलाबी गुलाबी दिसतंय… 
स्वतःशीच हसून 
टपली द्यायला हात 
ओपओप पुढे येतोय… 
कानाला हेडफोन लाऊन 
मोठ्याने गाणी ऐकायचं 
फॅड लागलय… 
जेटलॅग लागल्याप्रमाणे 
रात्र जागून निघते… 
पहाटेच्या स्वप्नांची जागा 
आईच्या खिटपिटने होते… 
मैत्रिणींचे फोन 
येऊन कधी गेले कळतच नाही… 
मित्रांच्या टोमण्यांना 
अर्थच नाहीय हे कळून सुद्धा 
खूप हसू येत… 
मुंबईच्या आठवणींच्या पेटीला 
मीच ताळ ठोकलय… 
येणाऱ्या प्रत्येक क्षणाला 
मला स्वतःमध्ये सामावायचंय… 
क्या पता कल क्या होगा?
म्हणत आताच सगळ जगून घ्यायचय… 
म्हणून सगळ गुलाबी गुलाबी दिसतय… 

प्रिया सातपुते 

Wednesday, 6 November 2013

प्रियांश...७



मेहंदी काढताना मनात काहीच विचार नव्हते…दिवाळीच्या मुहूर्तावर या हिरव्या रंगाला चढवले खरे! प्रत्येक रेषेनजीक दरवळणारा तो मेहंदीचा सुगंध आपसूकच चारचौघांना भुरळ घालत होता…अन जणू सांगत होता, "पहा पहा मी किती सुगंधित केल या मेहंदीला!"…गालातल्या गालात खुदकन हसून मेहंदीने प्रत्युत्तर द्यायला विलंब मात्र लावला नाही,"खरा सुगंध तर तेव्हा दरवळला जेव्हा मी या हातांवर विराजमान झाले!"…दोघांच्या भांडणात हिरव्या रंगाला काळा रंग चढला,…सुगंध मात्र तसाच होता…मेहंदीला चिडवत तो म्हणाला," बघ, बघ तू तर हिरवीची काळी झालीस, मी मात्र…तेवढ्यात पूर्ण होऊन सुकलेल्या मेहंदीकडे आकर्षित होऊन कौतुक करणाऱ्यांचे शब्द ऐकताच, मेहंदी काहीच बोलली नाही…दुसऱ्या दिवशी सुकून मेहंदीचे तुकडे पडले…हातावरून ती निघून जात होती, सुगंध तिला हिणवून म्हणाला,"पाहतेयस का? आता थोड्या वेळात तू कायमची गायब होशील."…रंगलेल्या मेहंदीकडे पाहत मी आईला म्हणाले, "हे बघ कशी रंगली आहे?"…आई पाहतच म्हणाली,"वाह! मेहंदीचा रंग मस्त चढला आहे, नवरा खूप प्रेम करणारा भेटणार तुला."…हे ऐकताच मेहंदी सुगंधाला म्हणाली," हातावरून सुकून पडले म्हणून काय झालं? कधीही न जाणारा असा रंग मी तिच्या मनात कायमचा कोरला आहे!"

सुगंध शॉक्स, मेहंदी रॉक्स!!

प्रिया सातपुते