Sunday, 10 November 2013

प्रियांश...९


आज पुन्हा जात नावाच्या जखमेची खपली निघाली अन रक्ताची चिळकांडी उडाली. जोपर्यंत या देशात माणसाला माणूस म्हणून वागवलं नाही जाणार ही जखम कधीच भरणार नाही…भूतकाळात रमणारी मी नाहीच पण, नजरेखालून जातीच्या नावाने होणारे किळसवाणे प्रकार जेव्हा नजरेसमोर येतात तेव्हा मन भरकटत भळभळून वाहणाऱ्या त्या बालिश मनाजवळ येऊन पोहचत, अपमानाच्या रक्तात चिंब ओथंबलेलं माझं सात वर्षांचं मन…जिथे ना जात माहित होती ना धर्म! 
आई बाबांना मदतीला दुकानांत जायची, मग अभ्यास कसा होणार? एकटीला घरात कसं सोडणार म्हणून शाळेजवळच एका बाईंकडे मला पाठवण्यात आलं…देवाने फार लवकरच गोष्टी समजायचा आशीर्वाद दिला होता कि शाप हे अजूनही माहित नाही. मला त्यांच्या बाहेरच्या खोलीत शिकवलं जायचं, एकदा माझा अभ्यास संपवून मी गपचूप बसले होते, आतून बाईंचा आवाज आला, आत ये आणि दाखव अभ्यास…दुसऱ्याच्या घरात आतपर्यंत घुसण्याची माझी सवय नव्हती, पुन्हा एकदा आवाज आल्यामुळे मी आत गेले, दचकत मी पुढे जात होते तोच त्यांच्यातला चातुर्वर्ण्य जागा झाला असावा…नको नको थांब तिथेचं आत येऊ नकोसं म्हणत त्यांनी मला दरडावल! अभ्यास दाखवून मी माघारी परतले तोच आवाज कानी पडले, बाई आणि त्यांची मुलगी बोलत होत्या, " आत आली असती ती आता, पुन्हा नको बोलवूस, सार माजघर पवित्र करावं लागलं असतं." त्या रात्री मी माझ्या आई बाबांना प्रश्नांनी भंडावून सोडलं होत, पवित्र म्हणजे काय? गोमूत्र का मारतात? तसं का बोलल्या त्या? त्यांनी मात्र कलाने घेत मस्त पैकी सगळ्या प्रश्नांना गुंडाळून ठेवलं. 
खूप छान होत्या त्या बाई, काहीच तक्रार नाही त्यांच्याबद्दल! फक्त एकचं विचारूस वाटत त्यांना, त्या तर शिक्षिका होत्या ना, तरी सुद्धा त्यांनी अश्या गोष्टींना प्रोहोसान का दिलं? माझ्यातल्या सात वर्षाच्या मुलीला न पाहता त्या इतक्या कर्मठ का झाल्या? 
शिक्षकच अशे वागतील तर समाज कसा घडेल? 

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment